नामदेव ढसाळांच्या कवितेविषयी किंवा स्वतः त्यांच्याविषयी लिहिताना कोणताही एकच संदर्भ अपुरा ठरतो. त्यांचा कवी म्हणून परिचय करून घेत असताना केवळ काव्यविषयक कामगिरी बघावी म्हटले तरी दलित कविता,दलित पँथर, कम्युनिस्ट चळवळ, आंबेडकरी चळवळ, लघुनियतकालिकांची चळवळ, आणीबाणी-इंदिरा गांधी, शिवसेना हे संदर्भ अपरिहार्यपणे पुढे येत राहतात. तसेच त्यांच्या राजकीय कामात त्यांच्या कवितेचे केंद्र सुटत नाही.किंबहुना कवी नामदेव ढसाळ म्हणून होणारी भाषिक कृती ही त्यांच्या राजकीय-सामाजिक कमिटमेंटचाच एक भाग आहे. ‘व्यक्ती, समष्टी आणि सृष्टी यांच्यातल्या अंतर्विरोधाला, व्यामोहाच्या अनेकविध पातळ्यांवर घेऊन जाण्याचा व्यवहार म्हणजे कविता,‘ असे ते कवितेकडे पाहतात. दलित म्हणून व्यवस्थेत नाकारला गेलेला असला तरी आपल्या कवितेच्या विषयात त्याने काही त्याज्य केले नाही. जे जे मानवी आहे ते ढसाळांच्या कवितेचा विषय आहे. त्यासाठी स्थळकाळाच्या सीमा रेषाही पुसल्या जातात. म्हणूनच पाब्लो नेरुदावर कविता होते, हिजड्यांवर त्यांची कविता दिसते. आंबेडकर, इंदिरा गांधी अशा दोन परस्पर भिन्न राजकीय विचार असलेल्या व्यक्तींवर कविता होते. मुंबईसारख्या शहरावर तर होतेचय परंतु दुष्काळावरही होते. बायकोपासून वेशेपर्यंत, आईपासून मावशी, आजी ह्या नात्यांवरही कविता होते. मराठी कवितेला इतक्या वेगवेगळ्या अंगाने फिरवून आणणार्या ढसाळांच्या कविता प्रदीर्घ आहेत, असं असूनही त्यात तोच तोचपणा नाही. त्यामुळे ही कविता आपल्याला कंटाळवत नाही, तर अनुभवाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर घेऊन जाते. अशा ह्या कवीची स्टाईल पुन्हा कधी ‘रिपीट‘ होणार नाही आणि हा कवीही पुन्हा ‘रिपीट‘ होणे नाही.
Copyright © 2025 IJRTS Publications. All Rights Reserved | Developed By iNet Business Hub